06 October, 2010

मराठी भाषा

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणारयांची एकूण
लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मीती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे.

भाषक प्रदेश

भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडूछत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू)

राजभाषा

भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेच्या सुचीत मराठीचा समावेश आहे.मराठी, महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यातदमण आणि दीव, दादरा व नगर हवेली या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (नवी दिल्ली) येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.

मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषा महाराष्ट्रगोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला. श्रावणबेळगोळ येथील सर्वात जुना मराठी शिलालेख, प्रताधिकार-कामत.कॉम सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.



श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।
या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ. स. १०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२ होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.

कालिक भेद

मराठी भाषेचे वय हे साधारण पणे १५००शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.

आद्यकाल

हा काल इ.स. १२०० पूर्व, म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काल होय. या काळात विवेकसिंधु या साहित्या व्यतिरिक्त नाव घेण्यासारखी कोणतीही साहित्यकृती पाहण्यास शिल्लक राहु शकली नाही. या काळातील मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात.

यादवकाल

हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगीरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखककवी यांना राजाश्रय होता. याच काळाता वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी साहित्याचे दालन भाषिक वैविध्यानी समृद्ध केले. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. सांकेतिक लिपी ची सुरुवातही याच काळात झाली असावी असे मानले जाते.

बहामनी काल

हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरु झाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झाल्याने मराठी भाषेत अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले, जसे तारिख. अशा धामधूमीच्या काळातही साहित्याची भर मराठी भाषेत पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनी भक्तीपर काव्याची भर घातली.

शिवकाल

हा काल इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच काळात राज मान्यते सोबत संत तुकाराम रामदास यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. तसेच मुक्तेश्वर, वामन पंडित यांनी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी या कवींनीही भाषेत भर घातली.

पेशवे काल

हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजयपांडवप्रताप या काव्या द्वारे खेड्यापाड्यात आपल्या कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. या साठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वांङ्मय प्रकार मराठीत विकसित झाले. याच काळात वाङ्मय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. या काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, वामन पंडित, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.

आंग्ल काल

हा काल इ.स. १७१८ ते आजतागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याचा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली. छपाई ची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेता उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्‍याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांने बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

१९५० ते १९८०



साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. साठीच्या मध्यान्ही विजय तेंडुलकरांचा सूर्य सांस्कृतिक आकाशात तळपू लागला होता; ‘शांतता’ने नवनाट्यविश्व व्यापलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नव-सर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पँथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्ष्लवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुस-या बाजूला ‘अ‍ॅकॅडमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक धर्मपीठ आणि श्री. पु. भागवत हे त्या व्हॅटिकनचे पोप. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु. ल. देशपांड्यांवर. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’चा.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हेसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.



‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री. ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी!) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग. वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. इचलकरांजीचे पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
 संकलन  - शाम मगर

No comments: